कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आता पेन्शनर प्राथमिक शिक्षकांना पेन्शन पोटी पाच लाखापर्यंतचे कर्ज देणार आहे. बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सेवानिवृत्त आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेटून मंत्री मुश्रीफ यांच्याकडे ही मागणी केली होती.

पेन्शनधारक प्राथमिक शिक्षकांची पेन्शन बँक खात्यावर जमा होण्यास विलंब झाला तर दर महिन्याच्या एक तारखेला सदर खात्यावर अधिकर्ष म्हणजेच ओवरड्राफ्ट मंजूर करण्याची सुविधा पेन्शनधारकांना दिली जाणार आहे. या सुविधा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना दिलासादायक असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी सेवानिवृत्त शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव सखाराम पाटील,  सरचिटणीस एम. बी. जाधव, कागल तालुकाध्यक्ष दस्तगीर वस्ताद, तालुका सरचिटणीस अशोक डवरी, संघटक तानाजी नलवडे, संघटक पी. बी. पाटील आदी उपस्थित होते.