कुरुंदवाड (प्रतिनिधी) : ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात गणेशभक्तांनी येथील पाच मशीद, गणेश मंदिर, विविध संस्था, घराघरात व सार्वजनिक मंडळांत निरनिराळ्या वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत, गुलाल व फुलांच्या पाकळ्यांची उधळण करीत भक्तांनी बाप्पांना घरी आणत गणरायाची आज विधिवत प्रतिष्ठापना केली.

राजवाड्यातील संस्थान सरकारच्या दीड दिवसाच्या गणपतीची पालखी मिरवणुकीने श्रीमंत भालचंद्रराव पटवर्धन यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनाच्या आपत्तीनंतर यंदा गणेशोत्सवाला मोठ्या थाटात सुरवात झाली आहे. कुरुंदवाड शहरात सकाळपासून लाडक्या बाप्पांना घरी नेण्यासाठी कुंभार गल्ली, मारुती चौक, मध्यवर्ती बाजारपेठ शहर व परिसर भक्तांनी व मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेला होता.

शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने सरकारी दवाखाना,दर्गा चौक,बाजार पेठ परिसरात वाहनांना बंदी घातली होती. ग्रामीण भागातून गणेशमूर्ती घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने भालचंद्र थिएटर चौक, बागवान गल्ली, शिवतीर्थ परिसरात उभी केली होती.

येथील कुडेखान, कारखाना, बैरागदार, शेळके, ढेपणपूर या पाच मशिदी व गणेश मंदिरात भक्तिमय वातावरणात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कुरुंदवाड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या हस्ते गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.