घरातील वयस्कर मंडळी नेहमी म्हणतात, ‘अरे जेवल्यानंतर लगेच बसू नकोस ‘ जेवल्यानंतर नेहमी चालावं, त्यामुळं अन्न जिरत चांगलं. पण, मनसोक्त जेवल्यानंतर कोण चालणार? छे…छे… असं म्हणत आपण झोपतो किंवा बैठक मारून बसतो एकदाचे. जेवणानंतरच्या चालण्याला बोली भाषेत आपण ‘शतपावली’ असं म्हणतात. पण, ही शतपावली किंवा फक्त दोन मिनिटांच्या वॉकमुळे आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होते.अलीकडील धावपळीच्या जीवनशैलीमुळे कित्येक लोक सकाळी फिरायला जाणं किंवा व्यायाम करणं टाळतात.

आपल्या शरीरासाठी चालणं खूप फायदेशीर मानलं जातं. काही जण रात्रीच्या जेवणानंतर फेरफटका मारायला जातात.पण, खरोखरच जेवणानंतर चालायलाच हवे का? जेवणानंतर चालल्याने खरंच शरीरावर फरक पडतो का? रात्रीच्या जेवणानंतर आपण दररोज चालत असाल तर आपल्या शरीरावर काय परिणाम होईल? याच विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत..

शतपावलीचे हे’ जबरदस्त फायदे

शरीरातील साखरेचं प्रमाण संतुलित राहतं

तज्ज्ञांच्या माहितीनुसार जेवल्यानंतर चालल्यामुळे स्नायू शरीरातील साखर पेशींमध्ये लवकर शोषली जावी यासाठी मदत करतात. त्याचसोबत इन्सुलिन प्रभावी पद्धतीने काम करण्यास मदत होते. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं. नानावटी रुग्णालयात स्पोर्ट्स मेडिसिन विभागप्रमुख डॉ. अली इराणी म्हणतात, “जेवणानंतर शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे 100 पावलं किंवा 10 मिनिटं चालल्यामुळे अतिरिक्त साखर स्नायू आणि यकृतातून शरीर खेचून घेते. ज्यामुळे साखरेचं प्रमाण योग्य रहाण्यासाठी मदत होते.”

पचनक्रिया सुधारण्यास मदत होते

जेवल्यानंतर काही वेळ चालल्यामुळे अन्नाचं पचन योग्य पद्धतीने होण्यास मदत होते आणि मनाला शांतता मिळते. डॉ. बनसोडे पुढे सांगतात, “जेवणानंतर चालल्याने पोट रिकामं होण्याचं प्रमाण जलग गतीने होतं. खाल्लेलं जेवण लवकर पचायला मदत होते.”

हृदयावर होणारा फायदा

चालणं हा हृदयासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. चालल्यामुळे हृदयाची गती वाढते आणि हृदयाचा व्यायाम होतो. संशोधकांनी अभ्यासात सहभागी स्वयंसेवकांना दर 20 मिनिटांनी 2 मिनिटं आणि 30 मिनिटांनी 5 मिनिटं चालण्यासाठी किंवा उभं रहाण्यासाठी सांगितलं. दिवसातून अनेकवेळा यावर लक्ष ठेवण्यात आलं. मुंबईतील सिम्बॉयसिस रुग्णालयाचे हृदयविकार तज्ज्ञ अंकुर फातरपेकर सांगतात, “चालताना सोलेस स्नायू अॅक्टिव्हेट होतात. यांना पेरिफेरिअल हार्ट मसल्स असंही म्हटलं जातं. हे स्नायू शरीरातील इतर भागातून हृदयाकडे रक्त परत पाठवतात. ज्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं.” पण, हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी जेवणानंतर जास्त व्यायाम करू नये. यामुळे हृदयावर प्रेशर येण्याची शक्यता असते.