मुंबई  (प्रतिनिधी) : माझ्याकडून नकळत एक चूक झाली आहे, ज्यामुळे मराठी भाषिकांना आणि त्यांच्या अस्मितेला ठेच पोहोचली आहे. मी मराठी लोकांची मनापासून माफी मागतो. मराठी भाषिकांना वाईट वाटावे, असा माझा कोणताही हेतू नव्हता, अशा शब्दांत प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू  यांने आपल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे.

माझ्यामुळे बिग बॉसलाही शरमेने मान खाली घालाली लागली आहे. त्यामुळे बिग बॉसचीही माफी मागतो. अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, याची मी काळजी घेईन, असेही जान याने स्पष्ट केले.

एका वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या रिआलिटी शोमध्ये जान कुमार सानू या स्पर्धकाने मराठी भाषेची चीड येत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर मनसे आणि शिवसेना नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत जान कुमार सानूवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेता बिग बॉसच्या घरात जान याला कन्फेशन रुममध्ये बोलवून त्याला कोणतीही भाषा, धर्म आणि जात, सांप्रदाय यावर बिग बॉसच्या घरात चर्चा करू नये, अशा कडक शब्दांत सुचना करण्यात आल्या.