पुणे : ‘मला बाबासाहेब पुरंदरे यांचे लिखाण कधीच पटले नाही, पुरंदरेंची भाषणे, लिखाण, पुस्तके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अन्याय केला. सत्यावर आधारित नवा इतिहास नव्या पिढीला आपणास द्यायचा आहे. पाखंडी इतिहास नको, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली आहे.

श्रीमंत कोकाटे लिखित ‘शिवचरित्र आणि विचारप्रवाह’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज (शनिवारी) पुण्यात झाला. यावेळी पवार हे बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय? दादोजी कोंडदेव व शिवाजी महाराजांचा कोणताही संबंध नव्हता. शिवाजी महाराजांना दिशा देण्याचे काम जिजाऊ माता यांनी केले. पुरंदरे यांनी सत्यांच्या आधारे मांडणी केली नाही, असा आरोप पवारांनी केला.

शिवाजी महाराजांवरील लिखाणात आतापर्यंत काही जणांनी सत्य, तर काहींनी असत्य लिखाण केले; परंतु कोकाटे यांनी एकत्रितरीत्या सत्य गोष्टींचे लिखाण केले, असे सांगून शरद पवार म्हणाले, देशात अनेक राजे होऊन गेले; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे जनतेचे राज्य होते. राज्य चालविण्याचा वेगळा दृष्टिकोन राजेंनी मांडला. इतिहासातील अनेक सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यामुळे मी खोलात जात नाही. गोविंद पानसरे यांनी जे पुस्तक लिहिले त्यातून छत्रपतींच्या काळातील वास्तव समोर आले. ते विसरता येणार नाही.

शेती, धर्म, न्याय आदी विषयक धोरण कोकाटे यांच्या पुस्तकात मांडण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडवर महात्मा फुले यांनी शोधून काढली. जमिनीशी बांधलकी असलेला कुलवाडीभूषण राजा असा उल्लेख त्यांनी केला होता. शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काहीजणांनी अन्य धर्मियांशी संकुचित विचार मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो खोडून काढत उदाहरणासह पुस्तकात मांडण्यात आला.