कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) : औरवाड (ता. शिरोळ) येथे गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पकडले. त्यांच्याकडून २६ लाख ६४ हजारांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण ३२ लाख ७४ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सचिन बबन कौलगे आणि महेश शिवाजी कोरवी (दोघे रा. रुई, ता. हातकणंगले) या दोघांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी ही कारवाई केली.

कर्नाटकातून कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून राजरोसपणे गुटखा, गांजा, मद्य वाहतूक होत असते. त्यामुळे अवैध वाहतूक व व्यवसायाला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथका मार्फत कारवाई सुरू केली आहे. गणेशवाडी मार्गे कुरुंदवाडच्या दिशेने चारचाकी वाहनातून तंबाखूजन्य गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथक नेमून औरवाड येथे पाळत ठेवली होती. या पथकात उपनिरीक्षक मोरे यांच्यासह संजय कुंभार, सागर माने, विशाल चौगले, सागर चौगले, महेश पाटील, महेश खोत यांचा समावेश होता.