कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या फूड सेफ्टी अॅक्‍टनुसार सन २०२२ या  वर्षासाठी ‘गोकुळ’ दूध संघाच्या श्री महालक्ष्मी पशुखाद्यास उत्पादन व विक्रीसाठी दिले जाणारे ब्‍युरो ऑफ इंडियन स्‍टँडर्डस (BIS) प्रमाणपत्र (CFIG.NO-CM/L7500231914) प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

याबाबत संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील म्हणाले की, या पुढील काळात बीआयएस मानाकंन स्‍टँडर्डप्रमाणे पशुखाद्याचे उत्‍पादन करून जिल्ह्यातील असंख्य दूध उत्पादकांना अधिक गुणवत्‍तापूर्ण पशुखाद्य उपलब्‍ध करून दिले जाईल. गाई- म्‍हैशीना आरोग्‍यदायी व गुणवत्‍तापूर्ण असे पशुखाद्य मिळावे, यासाठी पशुखाद्य उत्पादन व विक्रीसाठी बीआयएस प्रमाणपत्र घेणे आवश्‍यक असल्याचे भारत सरकारच्या अन्न व औषध विभागाने दिले होते.

त्यानुसार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून संघाने बीआयएस मानाकंन प्रमाणपत्र प्राप्‍त करून घेतले आहे. दर्जेदार गुणवत्‍तेचे पशुखाद्य गोकुळच्‍या दूध उत्‍पादकांच्‍या गाई व म्‍हैशींसाठी उपलब्‍ध केले जाईल. याचा दूध वाढीसाठी नक्‍कीच फायदा होणार आहे.

तसेच डिसेंबर २०२१ मध्ये १३ हजार मे. टन इतकी विक्रमी पशुखाद्याची विक्री झाली असून जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांचा संघाच्‍या महालक्ष्‍मी पशुखाद्यावरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे. याकरिता संघाचे सर्व दूध उत्‍पादक, दूध संस्‍था, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, अधिकारी व कर्मचारी यांचे श्रेय आहे.