टोकियो (वृत्तसंस्था) : जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची निधन झाल्याची माहिती एनएचके वृत्तवाहिनीच्या हवाल्याने दिली आहे. भरसभेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना जपानच्या नारा शहरात शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता (भारतीय वेळेनुसार ८.२९ वाजता) घडली.

आबे यांच्या एलडीपी (लिब्रल डेमोक्रॅटीक पार्टी) पक्षाच्या अधिकाऱ्यांनी कासीहारा शहरातील रुग्णालयामध्ये आबे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ते ६७ वर्षांचे होते, असे एनएचकेने म्हटले आहे. गोळी लागल्यानंतर आबे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचाही दावा स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला आहे. आबे यांना बेशुद्धावस्थेतच तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जवळजवळ तीन तास ते मृत्यूशी झुंज देत होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. २०२१ मध्ये भारत सरकराने शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

जपानच्या नारा शहरात शिंजो आबे भाषण करत असताना बंदुकीची गोळी झाडल्यासारखा आवाज आला आणि ते खाली कोसळले. एनएचके चॅनलच्या रिपोर्टरने गोळीचा आवाज ऐकू आल्याले म्हटले. शिंजो आबे खाली पडल्यानंतर ते रक्तबंबाळ झाल्याचे दिसले, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे. त्यानंतर त्यांनी उपचारादरम्यान रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन हल्लेखोरांना अटक केली आहे. शिंजो आबे यांनी आजारपणामुळे पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिंजो आबे यांच्यासोबत चांगले संबंध होते.