मुंबई (प्रतिनिधी) : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार हे निश्चित झाले आहे. भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा संध्याकाळी देणार असल्याचे खडसे यांनी माध्यमांना सांगितले. यामुळे भाजपमध्ये ते राहतील, याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

खडसे हे कन्या रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.२३ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यादेखील राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. त्यामुळे खडसे समर्थकांना सकाळी १० वाजता राष्ट्रवादी कार्यालयात येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, भाजपाच्या खासदार रक्षा खडसे या भाजपामध्येच राहणार आहेत.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीत प्रवेशानंतर खडसे यांच्यावर पक्ष संघटनेची मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत कोण-कोण राष्ट्रवादीमध्ये येणार याची उत्सुकता आहे. खडसे राष्ट्रवादीत येणार असल्याची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.