कुरुंदवाड ( प्रतिनिधी ) शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अज्ञाताने धारधार शस्त्राने हातावर व पायावर वार करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनिल भिमराव चव्हाण (वय ५५ रा. जुण्या पाण्याच्या टाकीजवळ, कुरुंदवाड) असे खून झालेल्या शेतकर्यांचे नाव आहे. येथील अशोका हाॅटेलच्या मागील बाजूस अनवडी नदीच्या नागझरी येथील गवती कुरणातील शेतात ही घटना घडली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.


दरम्यान खूनाची घटना समजताच इचलकरंजी विभागाचे पोलिस उपअधिक्षक समिरसिंह साळवे, कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पोवार यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.


घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मयत चव्हाण याचे अनवडी नदी कडेला शेती आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास आपली घोडागाडी घेवून चारा आणण्यासाठी गेला होता. साडेपाचच्या सुमारास त्याचा मेव्हणा तेरवाडचे उपसरपंच जालिंदर शांडगे त्याच ठिकाणी चारा आणण्यासाठी गेले असता सुनिल रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे दिसले.

सांडगे यांनी नागरीकांच्या मदतीने जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. खूनाची घटना समजताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी पोलिस फौजफाटा घेऊन पंचनामा केला. खूनी व खूनाचे कारण स्पष्ट झाले नसले तरी पोलिस त्याचा तपास करत आहेत.