नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीवरील लोकप्रिय अँकर होते. त्यांना कोरोना संसर्ग झाल्याने दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज (शुक्रवार) दुपारी बाराच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने प्रसारमाध्यम क्षेत्रांत हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांनी त्यांच्या दुर्दैवी निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी यांनी ट्विट करुन ही धक्कादायक माहिती दिली. रोहित सरदाना हे झी न्यूजमधून आज तकमध्ये आले होते. मितभाषी आणि संयमी न्यूज अँकर म्हणून ते परिचीत होते. ‘आज तक’ वाहिनीवरील ‘दंगल’ या शोचं ते अँकरिंग करत होते. २०१८ मध्ये त्यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. कोरोनाचा संसर्ग झाल्याने मागील शनिवारपासून त्यांच्यावर दिल्लीतील मेट्रो रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे चारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांनी शर्थीचे उपचार केले, मात्र आज दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

रोहित यांच्या पश्चात पत्नी, दोन छोट्या मुली असा परिवार आहे.