मुंबई (प्रतिनिधी) : अर्णव गोस्वामी किंवा कंगना रणौत असतील आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी सांगतोय की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच झाला पाहिजे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आज (मंगळवार) अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर ते बोलत होते. या वेळी त्यांनी कंगना आणि गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावावरुन सरकारवर टीकाही केली.

कायद्याच्या राज्यात प्रत्येक गोष्टीला कायद्याने उत्तर द्यायचं असतं. एखाद्याने चूक केली तर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. पण आमच्याविरोधात बोललं तर पोलिसांचा वापर करू असं सुरु आहे. सोशल मीडियावर या सरकारविरोधात एकही वाक्य लिहिलं तर तुम्हाला अटक झाल्याशिवाय राहात नाही अशी परिस्थिती आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांचा उल्लेख सन्मानानेच व्हायला पाहिजे. मात्र, विरोधी पक्षनेत्याचा उल्लेख कसाही केला तरी तो सक्षम आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

आमच्यावेळी विरोधात लिहिलं म्हणून कोणाला जेलमध्ये टाकलं नाही. सोशल मीडियावरील अनेक लोकांना नोटीस पाठवून एक सत्र सुरु आहे. मुस्कटबाजी सुरु आहे. माझं, सुधीर मुनगंटीवार आमचं कार्टून आलं त्यावर गलिच्छ लिहिलं त्यावर कारवाई नाही, अशी टीकाही या वेळी त्यांनी केली.