कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील कळंबा परिसरातील एका रूग्णाला आज (बुधवारी) दुपारी ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे  या रूग्णाने कोठेही प्रवास केलेला  नाही. त्यामुळे आरोग्य  विभागासह प्रशासनाची चिंता वाढली आहे. रूग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्यात येणार आहे.

कळंबा येथील आयटीआय परिसरातील एका व्यक्तीला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. तर त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील ३ व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली.  या तिघांना कोरोना  झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचे नमुने ओमायक्रॉन चाचणीसाठी २१ डिसेंबर रोजी पुणे येथे पाठविण्यात आले होते. आज दुपारी त्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये एकाला ओमायक्रॉन तर दोन व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध  घेतला जात आहे.