मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज (शुक्रवार) राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश केला. यावेळी त्यांची कन्या रोहिणी यांचाही प्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांनी मला प्रवेश दिलाबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचे भावना खडसे यांनी बोलून दाखवली.
खडसे म्हणाले की, आयुष्यातील ४० वर्षे भाजपमध्ये राहिल्यानंतर एकाएकी पक्ष सोडावा असे वाटले नाही. मात्र, विधानसभेत वारंवार माझी बदनामी झाली, छळ झाला. गैरव्यवहार असेल तर कागदपत्रं द्या. मात्र, या क्षणापर्यंत मला उत्तर मिळालेला नाही. मी आजवर खूप संघर्ष केला. मंत्रिमंडळात येण्यासाठीही मला संघर्ष करावा लागला. उत्तर महाराष्ट्रात भाजपला बळकटी देण्याचे काम आम्ही सातत्याने केले. पण भाजपमध्ये माझ्यावर अन्याय झाला, असेही खडसे यांनी सांगितले.
दरम्यान, एकनाथ खडसेंसोबत जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्य़ांतील त्यांचे समर्थक पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी हजर होते. कार्यक्रमानंतर समर्थकांनी खडसे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.