रांगोळी (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ९ दिवस दुर्गा दौडचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी दौडच्या शेवटच्या दिवशी मुलींना ध्वजाचा मान देण्यात आला होता. नवरात्र उत्सवाचे काळात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देशभरात दुर्गा दौड काढण्यात येते. आजच्या काळातील तरुणांच्या मनामध्ये शिवविचार व देशभक्ती जागृत करण्याचे उद्देशाने दौडचे आयोजन करण्यात आले होते.

या दुर्गा दौडची सुरुवात घटस्थापनेदिवशी करण्यात आली होती. प्रत्येक दिवशी रांगोळीमधील वेगवेगळ्या भागात दौड काढण्यात आली. प्रत्येक ठिकाणी रांगोळी काढून महिलांच्या हस्ते दौडचे औक्षण करण्यात आले. यावेळी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, दुर्गा माता व देशभक्ती वर गीत म्हणण्यात आली. यावेळी गावातील प्रत्येक मंदिरातील देवाची आरती करण्यात आली. यावर्षी दौडमध्ये मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. दसराच्या दिवशी अनेक भागात दौडचे जोरदार स्वागत करण्यात आले. मॉं शेरावाली नवरात्र उत्सव मंडळ येथील दुर्गा देवीची आरती करुन दौडची सांगता करण्यात आली.