कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदेचे (कोल्हापूर) कुलपती, डॉ. संजय डी. पाटील यांना कृषी तंत्र विषयक उल्लेखनीय कार्यासाठी ‘इंडिया अॅग्रीबिझनेस अॅवार्ड-२०२२’ ने सन्मानित  करण्यात आले. केंद्रीय दुग्ध, पशुपालन व मत्स्य संवर्धन राज्यमंत्री संजीवकुमार बालियान व हरियाणाचे कृषिमंत्री जे. पी. दलाल यांच्या हस्ते डॉ. संजय पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

‘इंडियन चेंबर ऑफ फूड अँड अॅग्रिकल्चर’ (आयसीएफए) च्यावतीने नवी दिल्ली येथील नास कॉम्प्लेक्समधील एपी शिंदे सभागृह, बुधवारी हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी सर्बियाचे राजदूत हिज एक्सलनसी सिमसा पविक,  नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद, फिलिपाईन्सचे माजी कृषी सचिव डॉ. विल्यम दार, जम्मू आणि काश्मीर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ बलदेव प्रकाष, आयसीएफएचे चेअरमन डॉ. एम. जे. खान, सचिव डॉ. एन. के. दादलानिया आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

‘आयसीएफए’ ही कृषी व्यवसाय, धोरण आणि विकास यासाठी काम करणारी भारतातील सर्वोच्च संस्था आहे. व्यापार सुलभीकरण, तंत्रज्ञान सहाय्य आणि कृषी व्यवसाय सेवांसाठी जागतिक व्यासपीठ म्हणून संस्था काम करते. भारतीय कृषी क्षेत्रातील महत्वपूर्ण आव्हानांचा अभ्यास आणि जागतिक स्तरावर अन्न आणि कृषी क्षेत्रातील वाढीला गती देण्यासाठी विकास, मूल्यवर्धन आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संधी त्यावर सक्रियपणे कार्य करते. आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आणि भागीदारीद्वारे जगभरातील अन्न आणि कृषी क्षेत्रात भारताचा सहभाग वाढेल असा आयसीएफएचा प्रयत्न असतो.

भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी व्यवसायांचे महत्त्व लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी ‘आयसीएफए’ ने ’इंडिया अॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स’ ची सुरुवात केली. कृषी विषयक धोरणे, कार्यक्रम, उत्पादन, निवेश, तंत्रज्ञान, विपणन, मूल्यवर्धन, पायाभूत सुविधा आणि निर्यात या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानकर्त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. २०२२ च्या या पुरस्कारांसाठी आयसीएफएने नीती आयोगाचे सदस्य डॉ. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली १५ सदस्यीय उच्चाधिकार निवड समिती स्थापन केली. या समितीने ‘इंडिया अँग्रीबिझनेस अवॉर्ड २०२२’ च्या २१ श्रेणीमधील पुरस्कार विजेत्यांची निवड केली. यामध्ये १९ कृषी व्यवसाय कंपन्या आणि दोन व्यक्तींचा समावेश आहे.

डॉ. संजय डी. पाटील यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल व शेती प्रणालीमध्ये अवलंबलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाच्या धर्तीवर या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. डी. वाय. पाटील कृषी नवा तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन, डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील आदी उपस्थित होते.