कुंभोज (प्रतिनीधी) : नेज हद्दीतील हातकणंगले-कुंभोज रोडवरील असलेल्या क्रशरच्या ठिकाणी शासन नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात कामकाज चालू असून, शासकीय यंत्रणांनी केलेले दुर्लक्ष नागरिकांच्या जिवावर बेतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्या परिसरातील क्रशर बंद करण्याची मागणी हातकणंगलेचे तहसीलदार यांच्याकडे नेज परिसरातील नागरिकांनी केली आहे.

संबंधित क्रशर चालक हे कुठल्याच नियमांचे पालन करत नाहीत. हातकणंगले-कुंभोज रोडलगतच्या क्रशरमधून निघणाऱ्या धुळीच्या कणांमुळे वाहनधारकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या धुळीच्या कणांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डोगर पायथ्याशी सतत होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे नेज-हातकणंगले गावास पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर हाऊसच्या टाक्यांना तडा जाऊन ते निकामी होण्याची श्यकता आहे. असे झाल्यास नेज व हातकणंगलेतील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबत त्वरित उपायोजना करून संबंधित क्रशर बंद करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या प्रकरणी माजी उपसरपंच सुभाष कांबळे, विनोद कांबळे यांनी तक्रार केली आहे.