पन्हाळा (प्रतिनिधी) : इतिहास उजळवणारा अनोखा दीपोत्सव पन्हाळ्यावर सोमेश्वर तलाव, छ. संभाजी मंदिर, छ. शिवाजी मंदिर याठिकाणी दिपावलीच्या पूर्व संध्येला कोल्हापूर हायकर्स यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, हर्षल सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ज्या गड-किल्ल्यांमुळे आज आपण घराघरात दिवाळी साजरी करतोय, तेच गड-किल्ले सण-उत्सवांच्या काळात अंधारात असतात. एकांतात असलेल्या या ऐतिहासिक वारसदारांना मानवंदना देण्यासाठी दिपोत्सव करत असल्याचे हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले

कोल्हापूर हायकर्स परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील एक सांज पन्हाळगडवर स्वराज्याच्या गडकोटांवर, एक सांज पन्हाळगडवर  धनत्रयोदशीची संध्याकाळ संकल्पना साकारली जाते. वर्षभर अपरिचित गड-किल्ल्यावर ट्रेकिंग आयोजित करणाऱ्या तरुणांचा ग्रुप म्हणून या ग्रुपची ओळख आहे. बदलत्या काळात इतिहासाचे भान सुटू नये आणि किल्ल्यांचे महत्व प्रत्येक तरुणापर्यंत पोहचावे यासाठी कोल्हापूर हायकर्स सतत प्रयत्नशील असते. प्रत्येक वर्षी वेगळ्या पद्धतीने अनेक उपक्रम साजरे करण्यात नेहमीच पुढे असतात.

आपण आपली दिवाळी कायम घरातच साजरी करत असतो, पण शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून संपूर्ण महाराष्ट्र उजळून टाकला त्याच महाराजांनी घडवलेले अनेक किल्ले दीपावलीच्या काळात अंधारातच असतात. नेमक हेच हेरून कोल्हापूर हायकर्सतर्फे गेल्या दहा वर्षांपासून पन्हाळागडावर धनत्रयोदशीच्या दिवशी दीपोत्सव साजरा केला जात आहे.