कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन रात्री संपताच आज सकाळी सात ते अकरा दरम्यान ग्राहकांनी खरेदीसाठी झुंबड उडवली. भाजीपाल्यासह विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी रास्त धान्य भाव दुकानांसमोर रांगा लावल्या होत्या. एकंदरीतच कडक लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरात पुन्हा गर्दीचा अनुभव येत आहे.शहरातील मुख्य बाजार असणाऱ्या ठिकाणी भाजीपालासह इतर विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. मात्र रस्त्याच्या कडेला थांबून विक्री करण्यासाठी भाजी विक्रेत्यांना परवानगी आहे. परिणामी शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर गर्दी जाणवत होती.

कोळेकर तिकटी मिरजकर तिकटी याठिकाणी पोलिस स्वतः थांबून रस्त्याकडील पांढऱ्या पट्ट्याच्या बाहेरच विक्रीसाठी थांबू देत होते. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लक्ष्मीपुरी भाजी मंडईमध्ये मात्र गर्दीच गर्दी होती. मुख्य लक्ष्मीपुरी बाजारात मात्र पोलिस दिसत होते. राजारामपुरी परिसरातील आईचा पुतळा परिसरात नार्वेकर मार्केट मधील विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा विक्रीसाठी बसले होते. त्यामुळे त्या परिसराची ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. तसेच शहरातील ठिकाणी कोपऱ्यावर आंबे विक्रेत्यांनीही गर्दी केली होती.

कोल्हापुरातील अनेक वडापावच्या गाड्यावर तसेच बेकरी आणि दूध, पनीर खरेदी करण्यासाठीही गर्दी दिसत होती. रास्त भाव रेशन दुकानावर धान्य उपलब्ध झाल्याने ते घेण्यासाठी रांगा दिसत होत्या.