कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (शनिवार) सकाळी शाहूवाडी तालुक्यातील गोकुळचे एक ठरावधारक कोरोनामुळे दगावले आहेत. तर आणखी एक ठरावधारक कोरोनामुळे अत्यवस्थ असल्याचे समजते. संबंधित ठरावधारकावर जयसिंगपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. यामुळे गोकुळच्या निवडणुकीला कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना दिसून येत आहे.

कोरोनामुळे राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण न्यायालयाच्या आदेशानुसार गोकुळची निवडणूक लागली आहे. ऐन कोरोनाच्या काळात गोकुळचा प्रचार सुरु आहे. इच्छुक उमेदवार आणि नेते जिल्हा पिंजून काढत आहेत. चारच दिवसांपूर्वी भुदरगड तालुक्यातील एका नेत्यासह ७ ते ८ ठरावधारकांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती.

दरम्यान आज शाहुवाडीतील डोणोली येथील सुभाष पाटील हे ठरावधारक कोरोनामुळे दगावले आणि गोकुळच्या एका मतदाराला कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. हे होत असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिरोळ तालुक्यातील एका ठरावधारकाला कोरोनाची लागण झाली असून ते अत्यवस्थ असल्याची माहिती समजते आहे. संबधितावर जयसिंगपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एकंदर सर्व परिस्थिती पाहता गोकुळच्या निवडणुकीला कोरोनाचा घट्ट विळखा बसत असून याचा परिणाम निवडणुकीच्या प्रचारावर देखील होताना दिसून येत आहे. यातच सत्ताधारी गटाने कोरोनामुळे सर्वोच्च न्यायालयात निवडणूक स्थगित व्हावी, म्हणून धाव घेतली आहे. त्याची सुनावणी सोमवारी आहे. आता न्यायालयात काय निर्णय होणार यावरच गोकुळच्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.