सांगली (प्रतिनिधी) : सांगली लोकसभेच्या जागेसाठी ठाकरे शिवसेनेने धरलेला आग्रह जिल्ह्यातील काँग्रेसला मान्य नाही. यामुळे उद्या (गुरुवार) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मिरजेत होणाऱ्या जनसंवाद मेळाव्यापासून अलिप्त राहण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

या मेळाव्यासाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे शरद पवार पक्षाचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत. सांगलीच्या जागेसाठी निर्माण झालेल्या पेचप्रसंगामुळे महाविकास आघाडीत सांगलीत तरी बेबनाव निर्माण झाला असून यातून मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत मिळत आहेत.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोल्हापूरच्या बदली सांगलीच्या जागेवर ठाकरे शिवसेनेने हक्क सांगत असताना पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही जाहीर केली आहे.