कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहर हवा प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी केले. त्या आज (शुक्रवार) राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी बोलत होत्या. यावेळी महापौर आणि आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते गांधी मैदान येथे या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

महापौर म्हणाल्या की, कोल्हापूर शहरातील हवेची गुणवत्ता स्वास्थ्यपूर्ण रहावी, यासाठी सर्वांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत. राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रम महापालिका क्षेत्रात अधिक नियोजनबध्द राबविण्यासाठी प्रशासन दक्ष राहील. शुध्द हवा कार्यक्रमांर्तगत सफाई आणि स्वच्छतेवर अधिक भर दिला जाईल. जल, जमीन, हवा, वनस्पती ही नैसर्गिक संसाधने असून त्यांचा दर्जा व गुणवत्ता खालावणार नाही ,प्रदूषण होणार नाही याची दक्षता सर्वानी घ्यावी.

यावेळी आयुक्त म्हणाले की, कोल्हापूर शहर हवा प्रदूषणमुक्त होण्यासाठी महापालिका प्रशासनामार्फत करावयाच्या उपाययोजनांचा कृतीआराखडा तयार करुन त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. उघड्यावर पालापाचोळा जाळणे, वाहनांचा अतिवापर न करणे इत्यादी बाबींचे महत्त्व त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, नगरसेवक अशोक जाधव, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एन.एस. पाटील, कॉ. चंद्रकांत यादव, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबंरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.