टोप (प्रतिनिधी) : येथील छ. राजाराम विकास सेवा संस्थेची १०० व्या वर्षाकडे वाटचाल सुरु असताना आता तब्बल १२ वर्षांनंतर निवडणूक लागली आहे. निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी चुरशीने संपला. यावेळी सत्ताधारी तसेच विरोधी परिवर्तन पॅनेलने शक्तिप्रदर्शन करत पायी प्रचार फेरी पूर्ण केली. यावेळी सभासदासह शेकडो महिलांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

तब्बल १२ वर्षानंतर लागलेल्या या निवडणुकीत एकमेकांवर आरोपप्रत्यारोपांची राळ उठविण्यात आली. पण आता सभासद कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार ? याकडे पंचक्रोशीतील सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपेक्षा चुरशी आणि अटीतटीची ही निवडणूक परिसरात चर्चेची विषय ठरली आहे.

जाहीर प्रचार संपल्यानंतर आता अंतर्गत फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. गावातील अनेक मातब्बर नेत्यांचे नशीब उद्या मतपेटीत बंद होणार आहे. तर यातून अनेकांची पुढील वर्षी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीची पेरणी सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे संस्थेवर सत्ता आणण्यासाठी दोन्ही पॅनेलकडून निकराचा प्रयत्न सुरू आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडीला सत्ता कायम राखण्यात यश येणार की परिवर्तन पॅनेल सत्ता खेचून घेणार. दोन्ही पॅनेलकडून आपलीच सत्ता येणार असे दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. परंतु सभासद कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.