लंडन (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. जॉन्सन यांच्या सरकारमधून बंडखोरी करत ४० पेक्षा जास्त मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्यावर पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली आहे.

जोपर्यंत नव्या पंतप्रधानांची घोषणा होत नाही, तोपर्यंत जॉन्सन पदभार सांभाळणार आहेत. ‘मला माझ्या कामगिरीचा प्रचंड अभिमान आहे, जोपर्यंत नवीन नेता येत नाही तोपर्यंत मी काम करत राहीन’, असे मत बोरिस जॉन्सन यांनी व्यक्त केले आहे.

अविश्वासाचा आरोप करत बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील ४० पेक्षा जास्त आमदारांनी आपला राजीनामा दिला होता. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरु लागली होती. ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी सर्वप्रथम ५ जुलै रोजी आपला राजीनामा दिला होता. त्यानंतर आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. बोरिस जॉन्सन यांच्या कट्टर समर्थक प्रीती पटेल यांनीही जॉन्सन यांच्यावर विश्वास नसल्याचे कारण देत आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.