मुंबई (प्रतिनिधी) : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात भारतीय जनता पक्षाने आज (रविवारी) आंदोलन केले. बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याविरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपने आंदोलन केले आहे. भुट्टो यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे पुतळेही जाळले आहेत. 

बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेल्या अवमानजनक वक्तव्याच्या विरोधात पुण्यात भाजपने तीव्र आंदोलन केले. पुण्यातील अलका टॉकीज चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बिलावल भुट्टो यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानातील बिलावल भुट्टो असो किंवा भारतातील काही राजकीय पक्ष यांची भाषा एकसारखी असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला.

नागपुरातही भाजप कार्यकर्त्यांनी बिलावल भुट्टो आणि पाकिस्तानचा निषेध करत तीव्र आंदोलन केले. सीताबर्डी परिसरातील व्हेरायटी चौकावर महात्मा गांधी यांच्या पुतळासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी बिलावल भुट्टो यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वाशीम व चिखली येथेही आंदोलन करण्यात आले.

कोल्हापुरात पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बिलावल भुट्टो आणि पाकिस्तानच्या झेंड्याचे दहन कोल्हापुरात करण्यात आले. कोल्हापुरात भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणाबाजी झाल्यानंतर भुट्टो यांच्या छायाचित्राला कोल्हापुरी चप्पलने प्रसाद दिला आणि पाकिस्तानच्या झेंड्यासह बिलावल भुट्टो यांचे पोस्टर जाळण्यात आले.