राशिवडे (प्रतिनिधी) : नवीन शासन निर्णयानुसार शेअर्सची रक्कम दहा हजार वरून पंधरा हजार केली आहे. त्यासाठीची अधिकची रक्कम ऊस उत्पादकांच्या येणाऱ्या बिलातून कपात होऊ नये, तसेच येणे असलेली शेअर्स साखर मिळावी, कामगारांचे थकीत पगार भागवावेत अशा मागणीचे निवेदन भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन पी. एन. पाटील यांना भाजपाचे हंबीरराव पाटील यांनी दिले.

निवेदनात म्हटले आहे की, गेली दोन वर्षे कोरोना, अतिपाऊस आणि महापूर यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. त्यातच शेअर्स रक्कम कपात करून त्याच्या अडचणीत आणखीन भर टाकू नये. सभासदांची शेअर्सची साखर बेचाळीस ते पंचेचाळीस महिन्यांची देणे राहिलेली आहे ती सभासदांना त्वरित देण्यात यावी. कामगारांचे पगार ही दहा महिन्यांपासून थकीत आहेत तेही त्वरित भागवावेत. बेकायदेशीर नोकरभरती थांबवावी.

सध्या सुरू असणारा ऊसतोड कार्यक्रम ही योग्य प्रकारे न होता वशिलेबाजीने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ऊस तोडणी-ओढणीच्या कार्यक्रमाची कडक अंमलबजावणी करावी. या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी झाली नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.

निवेदनावर राधानगरी तालुका भाजपा अध्यक्ष संभाजी आरडे, नामदेव पाटील-कुरुकलीकर, भोगावतीचे संचालक दत्तात्रय मेडसींगे, सुभाष जाधव, संतोष कातीवले, कृष्णात भोसले,बाजीराव लांबोरे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.