बेळगाव ( वृत्तसंस्था ) लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली तसतशी वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत सध्या घराणे शाळेतील उमेदवारांच्या संदर्भातील चर्चा जोरात रंगत आहेत. विशेषत: भाजपमधील सामान्य कार्यकर्त्यात खळबळ निर्माण झाली आहे. भाजपाने यावेळी कोणत्याही पद्धतीने घराणेशाहीला प्राधान्य देऊ नये अशा प्रकारची प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे.

चारशे पार करण्याचा विडा उचललेल्या भाजपने बेळगाव लोकसभा मतदारसंघात नेमकी उमेदवारी कोणाला द्यायची, त्यासंदर्भात विचारमंथन सुरू केले आहे. हे विचारमंथन सुरू असतानाच चर्चा होत आहे ती काँग्रेस मधून भाजपमध्ये परत आलेल्या माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याबद्दल. जगदीश शेट्टर हे बेळगाव लोकसभा उमेदवारीच्या आशेवर परत आले आहेत अशा प्रकारची चर्चा सुरू आहे.

कार्यकर्त्यांचा विरोध लक्षात आल्यावर आपल्याला उमेदवारी मिळत नसेल तर आपल्या सुनेला अर्थात माजी खासदार सुरेश अंगडी यांच्या कन्येला तिकीट द्या, अशा प्रकारची मागणी त्यांनी केल्याचे समजत आहे. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांत याबद्दल असंतोषाचे वातावरण आहे. कोणत्याही परिस्थितीत या घराणेशाहीला भाजपने स्थान देऊ नये. ही भाषा भाजप कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.

भाजपचा अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा घराणेशाहीच्या राजकारणाला तीव्र विरोध आहे. इतर पक्षांवर शरसंधान साधत असताना या प्रकारच्या घराणेशाहीला त्यांनी वारंवार विरोधच केला आहे. खासदार सुरेश अंगडी यांचे निधन झाल्यानंतर सहानुभूतीच्या दृष्टीने त्यांची पत्नी मंगला अंगडी यांना तिकीट देऊन पोट निवडणुकीत खासदार बनवण्यात आले. मात्र आता नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना स्थान देण्याची गरज निर्माण होत आहे.

लाईव्ह मराठीने बेळगाव लोकसभा मतदारसंघात आढावा घेतला असता सध्यातरी चर्चेतील नाव माजी आमदार संजय पाटील यांचेच आहे. कन्नड आणि मराठी नागरिकांना धरून राहणारा, विकासाची दिशा देणारा आणि भाजपच्या जडणघडणीत मोठे योगदान दिलेल्या या व्यक्तीला तिकीट मिळावे अशा पद्धतीची मागणी स्थानिक भाजपाचे कार्यकर्ते करत असल्याची माहिती मिळत आहे.
यासंदर्भात उमेदवार म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा होते आहे, त्या संजय पाटील यांच्याशी चर्चा संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

अनेक कार्यकर्ते माझ्याकडे येऊन उमेदवारीसाठी अर्ज करा, पक्षाकडे मागणी करा अशी विनंती करत आहेत. दोन वेळा बेळगाव ग्रामीणचा आमदार असल्याचा तुमच्याकडे अनुभव आहे. तुम्ही मराठी आणि कन्नड भाषिकांचे नेते आहात. त्यामुळे बेळगाव लोकसभेसाठी आपलेच नाव पुढे यावे, या दृष्टीने आम्ही पक्षश्रेष्ठींकडे विनंती करणार आहोत. असे अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. संपूर्ण बेळगाव लोकसभा मतदारसंघात काम केल्याचा मला अनुभव आहे कारण भाजपचा अध्यक्ष या नात्याने आपण मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर काम केले असून सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. याचा उपयोग निवडणुकीत नक्कीच होईल असे त्यांनी सांगितले.

सामान्य कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आपल्या भावना पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही पद्धतीने घराणेशाही ला वाव न देता चालना न देता तिकीट संजय पाटील यांना मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. लोकसभेत भाजपचा गड राखायचा असेल तर कार्यकर्त्यांची मागणी पक्षाला मानावी लागणार असून तशी परिस्थिती निर्माण झाली आहे.