मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काल (शनिवार) आपला 87 वा वाढदिवस साजरा केला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अण्णा हजारेंना वाढदिवसानिमित्त व्हिडीओ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द ना. शिंदे यांनीच अण्णांबरोबर व्हिडीओ कॉलवर बोलत असल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मागील काही दिवसांपासून अण्णा हजारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शिखर बँक घोटाळा प्रकरणात देण्यात आलेल्या दिलाश्यावर आक्षेप घेणार होते. मात्र, आपल्याला यासंदर्भात कोणतीही कल्पना नसल्याचं सांगत अण्णा हजारेंनी अशी काही आक्षेप घेण्याचे वृत्त फेटाळून लावलं आहे. एकीकडे या प्रकरणामुळे अण्णा चर्चेत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अण्णा हजारेंना वाढदिवसानिमित्त व्हिडीओ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी, सेंच्युरी मारा, आपला आशीर्वाद, मार्गदर्शन असेच लाभत राहू द्या. खूप खूप शुभेच्छा. आरोग्य चांगलं राहू द्या. शतायुशी व्हा. सेंच्युरी मारा, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री शिंदेंनी अण्णा हजारेंना व्हिडीओ कॉलवर दिल्या आहेत. तर अण्णांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानत निरोगी राहिलं पाहिजे, असं विधान केलं.

यावर मुख्यमंत्र्यांनी, निरोगी ठेवणार परमेश्वर तुम्हाला. तुमची लोकांना, समाजाला, राष्ट्राला गरज आहे, असे अण्णांना सांगितलं. तसेच त्याची इच्छा असेल तसं होईल, असं अण्णा यावर म्हणाले. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. खूप खूप शुभेच्छा, असे मुख्यमंत्री व्हिडीओ कॉलच्या शेवटी म्हटले आहे.