पेठवडगाव (प्रतिनिधी) : आज पत्रकार परिषद घेवून करण्यात आलेले सर्व आरोप आम्ही फेटाळत असून निव्वळ बदनामी व इतर कारणासाठी हे आरोप करण्यात आले आहेत. खोट्या, ऐकीव माहितीच्या आधारे हॉस्पीटलची बदनामी करणाऱ्याविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती डॉ. सूरज कुडाळकर व  डॉ .स्मिता कुडाळकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकामध्ये ते म्हणाले आहेत, वडगाव येथील कुडाळकर हॉस्पीटल आपल्या सेवेसाठी आणि रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी परिसरात प्रसिद्ध आहे. शेकडो रुग्णांचे प्राण आम्ही जीवाची बाजी लावून वाचवले आहेत आणि आजही वाचवत आहोत. पण गेल्या काही दिवसापासून कुडाळकर कुटुंबियांना आणि आमच्या हॉस्पीटलला जाणीवपूर्वक बदनाम करून त्रास दिला जात आहे. आधी काही रुग्णांचे बिल कमी करण्याविषयी दबाव टाकण्यात आला. ते कमी करून दिल्यानंतर हॉस्पीटलमधील बायो वेस्टचा विषय करून त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आता काही रुग्णांना घेवून आमच्याविषयी बिनबोभाट आरोप केले जात आहेत. आरोप करणाऱ्यांचा हेतू काय आहे हे वडगाव परिसरातील नागरिकांना चांगल्याप्रकारे माहीत आहे. आज ज्या रुग्णांनी आमच्यावर आरोप केले आहेत त्यांनी खरी परिस्थिती सांगणे आवश्यक आहे. कुडाळकर हॉस्पीटलच्या कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे आम्ही काही नियम केले आहेत. त्या नियमानुसारच बिलाची व संबंधित रक्कमेची आकारणी केली जाते. अनेक गरीब रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसल्यास आम्ही सामाजिक बांधिकलीतून बिलांमध्ये सवलत देखील दिली आहे. पण सरसकट सर्वांना अशा प्रकार सवलत देणे आम्हाला शक्य होत नाही.

रुग्णांना लूबाडणे, त्यांचे आर्थिक शोषण करण्यासाठी आम्ही या क्षेत्रात आलेलो नाही. रुग्णसेवा करण्यासाठी आम्ही सेवेत आहोत.  वडगाव परिसर मेडिकल हब म्हणून विकसित होत असताना डॉक्टरांना वेठीस धरण्याचे प्रकार वाढले आहेत. असे प्रकारे वारंवार होत असल्याने काही प्रतिष्ठित डॉक्टरांनी वडगावमधील आपले रुग्णालय इतर ठिकाणी हलवले आहेत. भविष्यात देखील असे प्रकार होण्याची शक्यता आहे. वडगाव परिसरातील सुज्ञ नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे. कारण असे प्रकार होत राहिले तर शहरात चांगल्या आरोग्य सोयी मिळणे कठीण होईल.