सातारा (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांचा दसरा कडू झाला, तर नेत्यांना दिवाळी गोड करू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खा, राजू शेट्टी यांनी दिला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (सोमवार) साताऱ्यात उत्तर दिले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात सातारा जिल्ह्याची आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी सांगितले की, मागच्या वर्षीची रिकव्हरी पाहून हा निर्णय घेतला जातो. राजू शेट्टी त्यांच्या पद्धतीने त्यांची भूमिका मांडत आहेत. त्या संदर्भात चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल, यावेळी त्यांनी उसाच्या एफआरपीबद्दल गुजरात आणि महाराष्ट्रातील कारखान्यांचे गणित समजावून सांगितले.

मागच्या वर्षीची रिकव्हरी काय आहे, हे पाहून आपण एफआरपी देतो. एक टक्का साखर वाढली तर १० किलोला टनामागे ३०० रुपयांचा फरक पडतो, असे वाटते. गुजरात मध्ये तीन टप्यात पैसे दिले जातात, त्यामुळे गुजरात राज्यातील शेतक-यांना ५०० ते ६०० रुपये टनाला जास्त भाव मिळतो, साखरेचे पोत तयार झाले की १ रुपये व्याज सुरु होते, हे व्याज शेतकऱ्यांच्या पैशातून दिले जाते. १५ तारखेला कारखाने सुरु होत आहेत. १० कोटी रुपयांची साखर पडून आहे, म्हणजे दररोज रोज १० लाख रुपये व्याज सुरु आहे, याचा भुर्दंड पडतो. आर्थिक प्रश्न आहेत, चर्चा सुरु आहेत, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे त्यांच्या पध्दतीने भूमिका मांडत आहेत.  याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.