मुंबई  (प्रतिनिधी) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आयकर विभागाने आज (मंगळवार) नोटीस पाठवली आहे. तसेच अजित पवारांशी संबंधित कोट्यावधींची संपत्तीवर जप्ती आणण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 

मागील काही दिवसांपासून अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी व पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी  सुरू होती.  त्यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाची कारवाई झाली  आहे. आता  ९० दिवसांच्या कालावधीत प्रॉपर्टी बेनामी नसल्याची सत्यता सिद्ध करावी लागणार आहे. आयकर विभागाने ४ मालमत्तांवर तात्पुरती जप्ती आणण्यात आल्याची माहिती आहे. गोव्यातील रिसॉर्ट, दिल्लीतील घर व दोन साखर कारखान्यांची मालमत्ता  अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचे समजते. ही संपत्ती जवळपास १ हजार कोटींपेक्षा जास्त  आहे.