कोल्हापूर (प्रतिनिधी) : डिस्मेंटलीग ग्लोबल हिंदुत्व या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन करणाऱ्यांसह यामध्ये सहभागी होणारे आणि यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आज (बुधवार) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयामध्ये एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सबद्दल देशात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. डिसमेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व असे या कॉन्फरन्सचे नाव असून ही कॉन्फरन्स १० ते १२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ऑनलाईन होणार आहे. या कॉन्फरन्सच्या प्रायोजकांमध्ये जगभरातील नामवंत विद्यापीठांचा समावेश असल्याचे या कॉन्फरन्सच्या प्रसार साहित्यांतून दिसून येतो. या कार्यक्रमाशी संलग्न लोकांचा हिंदूंना कमी लेखण्याचा, तसेच हिंदूंचा झालेला वंशसंहार नाकारण्याचा प्रदीर्घ इतिहास जगजाहीर आहे. असे विचार जगभरातील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांपर्यंत जाणे  हे चुकीचे ठरणार आहे.

त्यामुळे डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सचे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि यांना मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

यावेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष किशोर घाटगे, शिवसेना उपशहरप्रमुख शशिकांत बीडकर, युवासेना तालुकाप्रमुख संतोष चौगुले, हिंदु एकता आंदोलनाचे चंद्रकांत बराले,  महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे सदस्य प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.