कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कागल तालुक्यातील ३९ गावातील आणि करवीर तालुक्यातील ५५ गावातील जागांमधील जमिनीचे (ज्या सामान्यत: केवळ कृषी विषयक प्रयोजनात वापरण्यात येत असतील अशा जमिनी खेरीज) भूमापन करण्याचे आदेश ८ मार्च २०१९ च्या अधिसूचनेद्वारे शासनाने दिले आहेत. त्यानुसार नोव्हेंबरपासून भूमापन अधिकारी हे काम सुरु करतील. भूमापन अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या तारखेस घराच्या व इतर मालमत्तेच्या बिनचूक मोजणीसाठी घर मालकाने उपस्थित राहून आवश्यक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

ते म्हणाले, भूमापन अधिकाऱ्यांकडून निश्चित करण्यात येईल, अशा तारखेला त्यांनी हजर रहावे आणि आपले अधिकार अचूकरित्या अभिलिखित करण्यात आले आहेत, याबद्दल खात्री करुन घ्यावी. भूमापनानंतर, जमिनीवरील, मालमत्तेवरील त्यांचे अधिकार, सनदा काढून कायम निश्चित करण्यात येते. अंतर्गत मोजणीच्या प्रयोजनासाठी कोणत्याही जागांमध्ये प्रवेश करणे आवश्यक असेल. त्या बाबतीत उक्त जागांच्या भोगवटादारांना २४ तासांपेक्षा कमी नसेल इतक्या मुदतीची पूर्व सूचना दिल्या खेरीज कोणताही भूमापकतीत प्रवेश करणार नाही.

जेवढ्या जमिनीचे भूमापन करावयाचे त्या जमिनीच्या मोजणीसाठी किंवावर्गीकरणासाठी कामगारांना मंजुरीवर लावण्यासाठी किंवा भूमापनासंबंधिच्या अनुषंगिक हेतुसाठी कोणताही खर्च झाल्यास तो जमीन धारकाकडून महसूल मागणी म्हणून वसुली योग्य असेल. भूमापनाचे काम तातडीने होईल आणि भूमापनाचा खर्च कमी होईल. यासाठी गावनिहाय समिती बनवून नियोजन करण्याचे तसेच ग्रामसभा आणि ड्रोनद्वारे गावठाण भूमापनाची पूर्व तयारी करावी. या संदर्भात २७ तारखेला संबंधीत तहसीलदारांनी सर्व यंत्रणांची बैठक घ्यावी.