कराड (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणामुळे रखडलेली सर्वच शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासाठी राज्य शासनाकडून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवार) येथे दिली. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त  कराड येथील प्रीतीसंगम येथे चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी त्यांनी  श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले की,  सुप्रीम कोर्टाने ९ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे ९ सप्टेंबर पूर्वी जे प्रवेश झाले आहेत ते एसईबीसीच्या पद्धतीने होतील. मात्र, त्यानंतरच्या प्रवेशांबाबत आम्ही विधी व न्याय विभागाशी, अॅडव्होकेट जनरलशी तसेच अॅड. थोरातांशी चर्चा केली. त्यानंतर दोन-तीन दिवसांत याबाबतचा अध्यादेश काढण्यात येईल.

दरम्यान, एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण आता न ठेवता खुल्या गटातून त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. ९ सप्टेंबर २०२० पर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करून  त्यांना प्रवेश मिळालेले नव्हते.  त्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश दिला जाणार आहे. तसेच हे सर्व प्रवेश मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेनुसार असतील