कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकताच मेक इंडिया नं. १ मोहिमेची सुरुवात केली आहे. देशभरातील युवकांना यामध्ये जोडण्याच्या हेतूने ‘आप’ युवा आघाडीच्या वतीने युथ वुईथ मेक इंडिया नंबर १ मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यांत पाच हजार युवकांना या सामील करणार असल्याचे ‘आप’ युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी सांगितले. मोहिमेच्या नोंदणीसाठी मिस्ड कॉल नंबर जाहीर करण्यात आला.

शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सन्मान आणि शेतीच्या क्षेत्रात भारताला सर्वोच्च स्थानी पोहचवण्यासाठी ही मोहीम असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, यासाठी आंदोलन उभारणार असल्याचे शिंदे म्हणाले.

युवा आरोग्य दूत, शिक्षामित्र, युवा शिवार संवाद आणि उद्यम सखी या उपक्रमांच्या माध्यमातून युवकांचे जाळे राज्यभर तयार करणार असल्याचे राज्य संघटक संदीप सोनावणे यांनी सांगितले. युवा आघाडीच्या पाठीशी आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी खंबीरपणे उभे असल्याचे ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर, युवा जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील, उपाध्यक्ष आदम शेख, युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी, शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, आदी उपस्थित होते.