कोल्हापूर (प्रतिनिधी): शहरातील गजबजलेल्या वस्तीत असलेल्या गांधी मैदानाच्या विविध समस्या तातडीने सोडवाव्यात, या सर्व समस्यांवर काम करण्यासाठी महापालिकेने विशेष टास्क फोर्स नेमून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ‘आप’ च्या शिष्टमंडळाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून या गांधी मैदानाला समस्यांचे ग्रहण लागले आहे. पावसाळ्यात तर मैदानाला तळ्याचे स्वरूप येते. आजूबाजूच्या गटारींमधून येणारे दुर्गंधीयुक्त पाणी अनेक दिवस साचून राहते. तळीरामांचा वावर असल्याने मैदानावर काचांचा खच पडलेला असतो. नियमित स्वच्छतेचा व देखभालीचा अभाव असल्याने गांधी मैदानाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.

पावसाळ्यात मैदानावर पाणी साचू नये, यासाठी तज्ज्ञांच्या साहाय्याने आराखडा बनवून स्टोर्मवाटर ड्रेन, गटर्स, सक्शन पंप याचे नियोजन करावे, मैदानाची देखभाल करण्यासाठी ग्राऊंड्समन नेमावा, मैदानाच्या सुरक्षततेसाठी पूर्णवेळ सुरक्षारक्षक नेमावेत, सीसीटीव्ही बसवावे, आत येणाऱ्या गेट्सची संख्या मर्यादित करावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

यावर प्रशासक डॉ. बलकवडे यांनी मैदानाच्या विकासासाठी आराखडा प्रस्तावित असून, त्यानुसार काम होणार असल्याचे सांगितले. आराखड्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केली. यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष घाटगे, सूरज सुर्वे, संजय साळोखे, अभिजित कांबळे,
दुष्यंत माने, सचिन वणिरे, मयूर भोसले, रवींद्र ससे आदी उपस्थित होते.