पुणे ( प्रतिनिधी ) पुणे विमानतळ येथे माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पीएमआरडीए टाटा सिमेन्स मेट्रो मार्गाबाबत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पीएमआरडीए टाटा सिमेन्स मेट्रोच्या कामाच्या प्रगतीचा पाटील यांनी आढावा घेतला.


पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिका-३ मुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या सुटण्यासोबत चार लाख प्रवाशांना लाभ होणार असून या मेट्रो मार्गिकेच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत नमूद केले.


बैठकीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे आयटी सीटी मेट्रो रेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर आदी उपस्थित होते.