गारगोटी (प्रतिनिधी) : कोरोनाच्या रुग्णांची संख्या शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे हॉस्पिटल, रुग्ण, त्यांचे नातेवाईकांना पळापळ करावी लागत आहे. यासाठी शासनामार्फत राधानगरी आणि गारगोटी ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सीजन जनरेशन प्लँटची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आ. प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

प्रतिसध्दी पत्रकात म्हटले आहे की, राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरीकांना जिल्ह्याच्या ठिकाणी ऑक्सीजन बेड मिळण्यासाठी धावाधाव करावी लागते. याकरीता जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण रुग्णालय, राधानगरी आणि ग्रामीण रुग्णालय, गारगोटी येथे ऑक्सिजन जनरेशन प्लाँट प्रस्तावित केला आहे. शासनामार्फत अधिक प्रमाणात निधी मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आमदार फंडातून सदर प्रकल्पांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी विनंती केली होती. त्याअनुषंगाने आमदार फंडतातून राधानगरी ग्रामीण रुग्णालयासाठी २५  आणि गारगोटी ग्रामीण रुग्णालयासाठी २५ लाख असा ५० लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

या ऑक्सीजन जनरेशन प्लाँटमधून दरदिवशी शंभर जम्बो ऑक्सीजन सिलेंडरची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे तालुक्यातील रुग्णांना मुबलक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध होणार असून यामुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.