कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील गोटमवाडी येथे 28 मार्च रोजी टेंम्पो मागे घेताना धडक लागून एक महिला गंभीर जखमी झाली होती. बेबीताई विश्वास गोटम (वय 57, रा.तांदुळवाडी पैकी गोटमवाडी, ता.पन्हाळा ) असे जखमी महिलेचे नाव होते. गोटम यांना कोल्हापूरात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, बेबीताई गोटम यांचा 29 मार्च रोजी मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद अरुण विश्वास गोटम (वय 31) यांनी कळे पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी चालक संशयित आरोपी गोरखनाथ दत्तात्रय गुंजवटे (रा.वेतवडे, ता.गगनबावडा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेम्पोचालक गोरखनाथ गुंजवटे 28 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास गोटमवाडी येथे कामानिमित्त टेम्पो घेऊन गेला होता. यावेळी टेम्पो मागे घेताना त्याठिकाणी शेताकडून घरी निघालेल्या बेबीताई गोटम यांना टेम्पोची जोराची धडक बसली.यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान 29 मार्च रोजी मृत्यू झाला.