एक मे हा दिवस आपणा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती झाली म्हणून आपण सर्वजण हा दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा करतो. तसेच हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. या दोन मोठ्या व महत्त्वाच्या घटनांमुळे १ मे हा दिन आपणा सर्वांसाठी विशेष महत्त्वाचा आहे; पण हा दिवस ‘कामगार दिन’ म्हणून किंवा ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणून केव्हापासून आणि का साजरा केला जाऊ लागला. चला तर मग जाणून घेऊया कामगार दिन का साजरा केला जातो व याचा इतिहास नक्की काय..?
पहिल्यादा हा दिवस कधी साजरा झाला?
आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जातो. 1889 मध्ये पहिल्यांदा कामगार दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा दिवस साजरा करण्याची योजना शिकागो, अमेरिकेत सुरू झाली, जेव्हा कामगार एक म्हणून रस्त्यावर आले.आपण कामगार दिन का साजरा करतो?
1886 पूर्वी अमेरिकेत चळवळ सुरू झाली. या आंदोलनात अमेरिकन कामगार रस्त्यावर आले. कामगार आपल्या हक्कासाठी संपावर गेले. या आंदोलनाचे कारण कामगारांच्या कामाचे तास होते. त्या काळात कामगार 15-15 तास काम करायचे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कामगारांवर गोळीबार केला. या काळात अनेक कामगारांना जीव गमवावा लागला. शेकडो कामगार जखमी झाले. या घटनेनंतर तीन वर्षांनी 1889 मध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली. या बैठकीत प्रत्येक मजुराला दिवसाला केवळ 8 तास काम करावे लागेल, असा निर्णय घेण्यात आला. परिषदेनंतर 1 मे रोजी कामगार दिन साजरा करण्याचे ठरले. दरवर्षी या दिवशी कामगारांना सुटी देण्याचा निर्णयही घेण्यात आला. नंतर अमेरिकेतील कामगारांप्रमाणेच इतर अनेक देशांतही 8 तास काम करण्याचा नियम लागू झाला.
भारतातील कामगार दिवस
अमेरिकेत कामगार दिन साजरा करण्याचा प्रस्ताव 1 मे 1889 रोजी अंमलात आला, परंतु भारतात हा दिवस 34 वर्षांनंतर साजरा करण्यास सुरुवात झाली. भारतातही कामगार अत्याचार आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवत होते. कार्यकर्त्यांचे नेतृत्व डाव्यांकडून केले जात होते. त्यांच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर 1 मे 1923 रोजी चेन्नईत प्रथमच कामगार दिन साजरा करण्यात आला. श्रमिक किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानच्या अध्यक्षतेखाली कामगार दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. अनेक संघटना आणि सामाजिक पक्षांनी या निर्णयाला पाठिंबा दिला.