मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे गटाकडून आता शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक केला जातो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यास शिवसेनेला अद्याप मुंबई पालिकेकडून परवानगी मिळालेली नाही. शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची जागा मिळावी, यासाठी मुंबई पालिकेकडे अर्ज केला होता. दुसरीकडे, शिंदे गटाकडूनही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

खरी शिवसेना आमचीच व आम्हीच बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे यंदा शिवतीर्थ म्हटल्या जाणाऱ्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेऊन शिंदे गटाकडूनही जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाऊ शकते. या मेळाव्याद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेवरील आपला दावा अधिक भक्कम करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिंदे गट व ठाकरे गटातील या वादामुळेच शिवतीर्थावर यंदा दसरा मेळावा कुणाचा होणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार असल्यानेच शिवसेनेला मेळाव्यासाठी परवानगी देण्याबाबत मुंबई महापालिकेने आखडता हात घेतल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. शिवसेनेला पालिकेने मैदानासाठीची परवानगी नाकारताच शिंदे गटाकडून हे मैदान मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या वादावर भाष्य केले आहे. नियमानुसार दसरा मेळाव्यास परवानगी दिली जाईल, असे फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळणार की यंदा शिंदे गट शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.