सांगली – सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम राज्यात वाजत आहे. सर्व राजकीय पक्ष नेते आपापल्या तयारीला लागले आहेत. एकीकडे महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटायचा काही नाव घेत नाहीय. सध्या सगळ्यांच्या नजरा लागून राहील्या आहेत त्या म्हणजे सांगली लोकसभा निवडणुकीकडेच. सध्या सांगली लोकसभा काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनत चालली आहे. कारण सांगली लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस मध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सांगलीची जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अजूनही काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व या जागेवरचा दावा सोडायला तयार नाहीये, त्यातच ‘या’ काँग्रेस नेत्याने केलेल्या वक्त्यानंतर चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांनी सांगली जागा संधर्भात मोठं वक्तव्य केलं आहे

काय म्हणालें काँग्रेस नेते विश्वजित कदम..?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला तातडीनं चर्चेसाठी नागपुरात बोलावलं आहे. त्यासाठी मी नागपूरला आलो आहे. रमेश चेनीथला यांच्यासोबतही फोनवरून संभाषण झालं आहे. सांगलीच्या जागेवर लवकर तोडगा काढावा, जेणेकरून सांगली लोकसभेत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक ठोस पाऊल घेता येईल अशी भूमिका आम्ही मांडली असल्याचं विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. दरम्यान काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी देखील सांगलीमधून लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, यावर देखील विश्वजित कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नाही, मात्र शेवटच्या क्षणालाही एबी फॉर्म जोडला जाऊ शकतो. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी दोन अर्ज भरले आहेत, एक काँग्रेस पक्षाचा आणि एक अपक्ष म्हणून असं कदम यांनी म्हटलं आहे.

चंद्रहार पाटील यांचं मोठं वक्तव्य

मी शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला निवडणूक लढतवता येणार नाही? हे काँग्रेस पक्षाने जाहीर करावे मी माघार घेतो? मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझे आजोबा मुख्यमंत्री नव्हते, माझे वडील आमदार नाहीत तर मला निवडून लढता येणार नाही? असे काँग्रेसने जाहीर करावे मी निवडणुकीतून माघार घेतो असं मोठं विधान सांगली लोकसभेचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे सांगलीतील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे सध्या सांगली लोकसभा उमेदवाराचा विषय अधिकच गुंतागुंतीचा बनत चालला आहे. त्यामुळे सांगली लोकसभा निवडणुकीतून मविआतुन कोण लढवणार या कडे सध्या राज्याचं लक्ष लागून राहिले आहे.