कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज (गुरुवार) महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांची बदली झाली असून नूतन आयुक्तपदी डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती झाली आहे. या अनुषंगाने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रशासनाच्या सर्व वरिष्ठ अधिकारी आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची तातडीची बैठक बोलावलेली होती.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयुक्त यांची बदली झाल्यामुळे आयुक्त यांनी बैठकीमध्ये आपल्याला ‘महानगरपालिकेच्या सर्वच अधिकारी/कर्मचारी यांनी खूप मोलाचे सहकार्य केले आहे. त्यामुळे आपण आपली कारकिर्द यशस्वी करू शकलो’, असे मत व्यक्त करून याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच कोविड योध्दा म्हणून काम करीत असताना मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे ५ प्रस्ताव आरोग्य संचालनालयामार्फत मंजुरीसाठी विचाराधीन आहेत. तसेच येथून पूढेही आपण मंत्रालयीन स्तरावर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहू, अशी ग्वाही दिली.