कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन यांना मधुमक्षिका पालन क्षेत्रातील उल्लेखनीय व निरंतर कार्याबद्दल ‘जीवन गौरव’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फेडरेशन ऑफ इंडिजिनस एपिकल्चरिस्टच्यावतीने केरळ येथील तिरुअनंतपूर येथे 18 जून रोजी मधुमक्षिका पालन विषयक राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. या परिषदेत केरळ सरकारचे प्रधान सचिव आणि कृषी उत्पादन आयुक्त डॉ. बी. अशोक यांच्या हस्ते डॉ. प्रथापन यांना सन्मानित करण्यात आले.

डॉ. प्रथापन हे शिक्षण, कृषी आणि संशोधन क्षेत्रात ३० वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्य म्हणून ते कार्यरत असून राज्य व केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. विविध क्षेत्रात त्यानी दिलेल्या योगदानाबद्दल र्याबद्दल यापूर्वी अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मधुमक्षिका पालन क्षेत्रातील त्यांच्या विशेष योगदानाची दखल घेऊन त्याना ‘जीवन गौरव’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. प्रथापन यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला. या पुरस्कारामुळे तसेच माझी जबाबदारी आणखी वाढली असून कामाला आणखी बळ मिळेल. माझ्या अनुभवाचा जास्तीत जास्त उपयोग डी वाय पाटील कृषी तंत्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न करेन. विद्यापीठाच्या माध्यातून कृषी संशोधनासाठी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न राहील, असे डॉ. प्रथापन यांनी सांगितले.

या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, वित्त अधिकारी सुजित सरनाईक यांनी डॉ. प्रथापन यांचे अभिनंदन केले.