मुंबई : राज्यातील भाजप सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसवून पाप केले आहे. ऍड उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजप सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्वल निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध मुद्द्यांचा उहापोह केला. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार राहिलेल्या उज्ज्वल निकम यांना पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या निकम यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. मात्र, भाजपकडून पराभव पचवल्यानंतरही उज्ज्वल निकम यांना सरकारने नव्याने बक्षीस दिलं आहे. उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यामुळे, यापूर्वी निकम यांच्याकडे असलेल्या सर्व खटल्यांचे कामकाज ते पुन्हा सुरू करणार आहेत. मात्र, काँग्रेसने उज्ज्वल निकम यांच्या फेरनियुक्तीला विरोध केला असून नाना पटोले यांनीही निकमांच्या नियुक्तीवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार हे विद्यार्थी व तरुणांची परिक्षा पहात आहे. नीट मध्ये पेपरफुटी झाली असतानाही सरकार त्याकडे गांभिर्याने पहात नाही, सरकारची भूमिका वेळकाढूपणाची व विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. केंद्रीय मंत्र्यांनी आधी पेपर फुटला नाही असे स्पष्ट केले होते आता पेपरफुटी झाल्याचे उघड होताच गुजरात व बिहारमध्ये पेपर फुटल्याचे सांगत आहेत पण या दोन राज्यात तर भाजपाचेच सरकार आहे. सरकारने नीट परिक्षाच रद्द करावी अशी काँग्रेसची मागणी आहे.

राज्यात पोलीस भरतीसाठी शारिरिक परीक्षा घेतल्या जात आहेत. पावसाळा सुरु झाला असताना शारिरीक चाचणी घेणे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. पावसाळ्यात मैदानात चिखल असतो, त्यामुळे अनेक उमेदवारांना त्याचा त्रास होतो, दुखापत होण्याची ही शक्यता असते. हे सरकार व पोलीस प्रशासन यांनी लक्षात घ्यायला हवे होते. पोलीस भरतीच्या शारिरीक परिक्षांवर सरकारने फेरविचार करावा, असे नाना पटोले म्हणाले.

राज्यात बोगस बियाणे व खतांचा सुळसुळाट
राज्यात आजही दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, खरीप हंमाग सुरु झाला आहे पण राज्यात बि, बियाणे, खते व औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. जी खते बियाणे बाजारात आहेत ती बोगस आहेत. बोगस बियाणे विकून व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. ही बोगस खते, बियाणे व औषधे गुजरात व आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात येत आहेत. राज्य सरकारने या बोगस बियाणे व खत विक्रेते आणि कंपन्यांवर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांची फसवणूक व लूट थांबवावी. आचारसंहितेचे कारण देऊन शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जात नव्हता. आता आचारसंहिता संपलेली आहे, राज्य सरकारने लक्ष घालून तातडीने विनाअडथळा कर्जपुरवठा होईल याची तजवीज करावी अथवा सरकाने निधी उपलब्ध करुन द्यावा, असेही नाना पटोले म्हणाले.

व्हिडीओ दाखवून बदनामी करण्याचा प्रयत्न
प्रसार माध्यमामधून माझ्याबद्दलचा एक व्हिडिओ दाखवून मला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. परंतु त्यात काही तथ्य नाही. अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना संत गजानन महाराजांची पालखी तेथे आली होती, मी वारकरी संप्रदायाचा असून गजानन महाराजांचे दर्शन घेण्यास गेलो असताना चिखलाने पाय माखले होते, एका कार्यकर्त्यांने पायावर पाणी टाकले आणि मी माझ्या हाताने माझे पाय धुतले, यात गैर काय आहे. मी शेतकरी माणूस आहे, मला चिखलाची सवय आहे, जे काही झाले ते दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात झाले आहे. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही परंतु ज्या लोकांचे पाय ईडी कारवायात माखलेले आहेत, ते रात्रीच्या अंधारात ज्यांचे पाय धुतात, पाय चेपून देतात त्यांच्याबद्दल काही तरी बोलले पाहिजे, तेही दाखवले पाहिजे पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. काँग्रेस पक्षाला लोकसभेत मिळालेल्या यशाने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत त्यामुळे अशा प्रकारे कारस्थाने करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण त्याचा काहीही फरक पडणार नाही असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.

या पत्रकार परिषदेला माजी मंत्री अनिस अहमद व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.