टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील टोप चौकात दुचाकीवरून रस्ता ओलांडणाऱ्या उचगाव येथील युवकाचा आयशर ट्रकने धडक दिल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मयत विशाल रामा वाळकुंजे ( वय १९) हा उचगाव येथील रहिवासी असून, तो कामानिमित्त टोप येथील बिरदेव मंदिर परिसरात आपल्या नातेवाइकांकडे आला होता. आपले काम उरकून तो उचगावकडे जाण्यासाठी रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास  टोप येथील चौक ओलांडून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना त्याच्या दुचाकीला (एमएच ०९ सीक्यू ७३४६) पुण्याकडून बेंगळुरूकडे जाणाऱ्या आयशर ट्रकने (केए २२ बी ५७८२) पाठीमागून जोराची धडक दिली. यामुळे तो रस्त्यावर पडला आणि त्याच्या कंबरेवरून ट्रकचे चाक गेल्याने कंबरेपासून पायाचा भाग निकामी होऊन तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील शासकीय रूग्णालयात दाखल केले असता त्याचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.