कॅनडा ( वृत्तसंस्था ) कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात शनिवारी विमान कोसळले. या अपघातात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमागे काही घातपात आहे का ? याचा तपास सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार मृत प्रशिक्षणार्थी भारतीय वैमानिकांची नावे अभय गद्रू आणि यश विजय रामुगडे अशी आहेत. हे दोघेही मुंबईचे रहिवासी असल्याचे बोलले जात आहे. कॅनडाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघात झालेले विमान हे दुहेरी इंजिन असलेले हलके विमान होते. हे पाइपर पीए-34 सेनेका म्हणून ओळखले जाते.

आणखी एका पायलटचा मृत्यू

चिलीवॅक शहरातील मोटेलच्या मागे झाडे आणि झुडपांमध्ये विमान कोसळले. या घटनेत भारतीय नागरिकांव्यतिरिक्त आणखी एका वैमानिकाचाही मृत्यू झाला. घटनास्थळी परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे कॅनडाच्या पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे.

या परिसरात इतर कोणी जखमी झाल्याची किंवा कोणत्याही प्रकारचा धोका असल्याची कोणतीही माहिती नाही. विमानाची टक्कर का झाली याबाबत अद्याप काहीही समजू शकलेले नाही. कॅनडाच्या वाहतूक सुरक्षा मंडळाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.