शेवगाव (प्रतिनिधी) : शेवगांव येथील गोरख सिताराम वाघमारे (वय ६३) यांनी फिर्यादीवरुन शेअर मार्केटींगची क्लासिक ब्रीज नावाचे शेअर या नावाने अहिल्यानगर जिल्ह्यातील आखेगाव इथल्या नागरिकांचा विश्वास संपादन करत कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे. अशी फिर्यादी शेवगांव पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
यावेळी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप मधुकर थोरात (वय ३५, रा. पाईपलाईन रोड, अहिल्यानगर), दिलीप तात्याभाऊ कोरडे (वय ३५, रा. घोगरगाव ता.श्रीगोंदा) यांची नावे समोर आली. यावेळी आरोपींचा शोध घेत असताना आरोपी संदीप थोरात हा त्याच्या रहाते घरी असल्याचे पोलिसांना समजले.
यावेळी संदीपला पोलिसांची चाहुल लागताच त्याने पोबारा केला. यावेळी पोलीसांनी त्याचा शिताफिने पाठलाग करुन त्याला पाईपलाईन रोड येथे पकडले. त्याची कसून चौकशी केली असता दिलीप कोरडेचे नाव समोर आले. पोलीसांनी कोरडे याचा शोध घेतला असता तो ही पोलीसांची चाहुल लागताच पळुन जात होता. यावेळी कोरडे याला पोलीसांनी ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींना शेवगांव पोलीसांनी अटक केलीय.तर पोलिसांनी, या आरोपींविरुध्द कोणाचीही फसवणुक झाली असल्यास त्यांनी शेवगांव पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
ही कारवाई , पो.नि. समाधान नागरे, सपोनि अशोक काटे, किशोर काळे, चंद्रकांत कुंसारे, संदिप आव्हाड, शाम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, प्रशांत आंधळे, संपत खेडकर, मारुती पाखरे, कृष्णा मोरे, सायबरसेलचे राहुल गुड्डु यांनी केली.