सांगली (प्रतिनिधी) : कोरोनावरील उपचारासाठी खासगी डॉक्टर भरमसाठ बिल घेत आहेत. यामुळे बिलासह उपचाराचेही ऑडीट करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.

दक्षिण भारत जैन सभेच्या डॉ. कर्मवीर आरोग्य अभियानतर्गंत चोपडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सुरू करण्यात आलेल्या कोरोना रूग्णावरील उपचार केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, ‘कोरोना आजारावर उपचाराची बिले भरमसाठ आकारल्याने कोरोना संशयित रूग्ण पुढे येत नसल्याचे चित्र आहे. उशिरा निदान झाल्यानंतर उपचारावर मर्यादा येत आहेत. परिणामी मृत्यू दर वाढत आहे. काही रूग्णालयात केवळ नर्सकडून रूग्णांची तपासणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे वाढीव बिलासह उपचाराच्या दर्जाचेही ऑडीट होण्याची गरज आहे.’