कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या जनरल मिटिंगमध्ये दूधाला  १० रूपये जादा दर देण्याची घोषणा केली होती. आता तेच २ रूपये देणार असल्याचे म्हणत आहेत, अशी घणाघाती टीका आ. पी. एन. पाटील यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर केली . गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आघाडीच्या पॅनेलची घोषणा आज करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

आ. पाटील पुढे म्हणाले की, संस्था मोडून खाल्ल्या, असा आरोप आम्ही त्यांच्यावर कधीही केलेला नाही. जिल्हा बँक अतिशय चांगल्या पध्दतीने चालली आहे. विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्यामुळे वासाचे दूध म्हणून काहीतरी काढायचं म्हणून मुद्दे काढले जात आहेत. माजी आमदार महादेव महाडिक यांच्या कुटुंबात उमेदवारी देण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतलेला  आहे. गोकुळ निवडणुकीसाठी अनेक सहकाऱ्यांनी तिकीट मागितले होते. परंतु सर्वांना तिकीट देण्यास मर्यादा आहेत, असे त्यांनी सांगितले. गोकुळ दूध संघ काटकसरीने चालविलेले संघ आहे. यापुढेही संघ चांगला चालविण्यासाठी आम्ही काम करू, अशी ग्वाही आ. पाटील यांनी यावेळी दिली.